आपल्या हाडाना (शास्त्रीय भाषेत अस्थी) मी इतकी विशेषण दिली पण आज खरच आपल हाड टणक,टिकाऊ,कणखर आहेत का?डॉक्टरकीचा अभ्यास संपून जेव्हा प्राक्टीस सुरू केली आणि जसजसे रूग्ण तपासू लागले तेव्हा याचं उत्तर नाही असं मिळालं.बरेचसे पेशंट जास्त करुन चाळीशीनंतरच्या काकू,मावशी,आजी ह्या आठवडा पंधरवड्यांनी काही ना काही दुखण्याच्या तक्रारी घेऊन येऊ लागल्या.बहुधा याच दुखण्यामुळे अनेक डॉक्टरांकडे फिरून आलेल्या आणि ही नविन डॉक्टरीण काहीतरी करेल आणि आपलं दुखणं थांबवेल असा विश्वास असलेल्या.
लगेचचं उपाय हवा असेल तर दुखण्यावर पेनकिलर (वेदनाशामक)हेच एक औषध आहे परंतु जर अधिक योग्य उपाय शोधायचा असेल तर या दुखण्याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे.
आपण एका उदाहरणाने सुरुवात करु.तुमच्या आमच्या सारखीच एका मध्यमवर्गीय घरात वाढलेली माझी मावशी.विशीत शिक्षण पंचवीशीत लग्न आणि तीशीच्या आत एक मुलगा एक मुलगी.पंनाशीपर्यंत घर सांभाळुन नोकरी.मांसाहारी दिवसातून कमीतकमी आठवेळा चहा पिणारी.सामान्यांच्या भाषेत चारचौघांसारख आयुष्य जगणारी.माझा डॉक्टरकीचा अभ्यास चालू असताना अधूनमधून आमच्याकडे आल्यावर मावशी नेहमी कंबरदुखी,पाठदुखी,सांधेदुखी बद्द्ल तक्रार करायची आणि औषध मागायची.रक्त तपासण्यास टाळाटाळ करुन मग नेहमीप्रमाणे आपल्या कामाला लागायची.हळुहळू मवशीचं दुखणं वाढत गेल म्हणजे इतक की तिला उठताबसताना त्रासा होऊ लागला,जास्तवेळ उभं रहाता येत नसे.या दरम्यान मावशीची मुलगी बाळंतपणाला आली असताना घरात पडल्याचं निमित्त होऊन मावशीचा उजवा हात फ्रॅक्चर झाला.
माझी ही मावशी म्हणजे तुमच्यापैकीच एक आहे.कुटुंबाच्या,नोकरीच्या रोजच्या दगदगीत स्वतःकडे दुर्लक्ष करणारी आणि अगदीच सहन न झाल्यावर डॉक्टरकडे धावणारी.पण याच खर कारण पाहील तर तुम्हाला वाटेल की खरच यावरचा उपाय किती सोपा आहे.
ओस्टीओपोरोसिस अथवा अस्थिक्षय हा असा आजार आहे ज्यात आपल्या शरीरातील हाडांच्या पेशींची झीज झालेली असते(reduced bone tissue).ज्यामुळे हाडांच्या अंतर्रचनेत विसंगती दिसते(microscpic structure or architecture of bone is abnormal).ओस्टीओपोरोसीस म्हणजे शरीरातील हाडांतून होणारा कॅल्शीअम(Ca) क्षय.आपले शरीर साधारण वयाच्या तीस वर्षापर्यंत अगदी जोमाने Ca शरीरात साठवते.एक व्यवहारातील उदाहरणातून हे स्पष्ट करूया.उमेदीच्या काळात एक तरूण जशी जास्तीत जास्त मेहनत करून पैसे आपल्या बॅंकेच्या खात्यात जमा करतो.तरूणपणी खर्चही होत असतो परंतु कमाईही त्याचप्रमाणात होत असल्याने बॅंकबॅलन्सबद्दल चिंता नसते.परंतु जसजशी निव्रूत्ती जवळ येते तशी काळजी वाढते कारण मिळकत तर कमी होते मात्र खर्च तितकाच असतो.
याच प्रमाणे आपले शरीर साधारण तीशीपर्यंत जोमात Ca साठा करते परंतु नंतर त्याचा जोर कमी होतो.खर्च मात्र तेवढाच असतो त्यामुळे हाडांतील Ca चे प्रमाण कमीकमी होते आणि त्यांची अंतर्रचना बिघडते.हाडं ज्या वयात तयार होतात त्या काळात शरीराला किती Ca मिळाले हे याचमुळे फार महत्वाचे आहे. Ca अनेक मार्गांनी आपल्याला मिळते.
अगदी लहानपणी आईचे दूध
प्राण्यापासुन मिळणारे दूध आणि त्या दूधापासुन बनणारे पदार्थ(पनीर चीज दही ताक इ.)
हिरव्या पालेभाज्या
बदाम ,अक्रोड,रेसीन्स,खजूर
सोयबीन व त्यापासून बनणारे पदार्थ
चवळी,वाटाणा यासारखी कडधान्य
मासे (कोळबी,शिपल्यातील मासे)
पण याच बरोबर या Ca ला शरीरात येण्यापासून रोखणार आहार सुध्धा आपण घेत असतो.
जसे कॅफीनचे अत्यधिक सेवन (कॉफी,चॉकलेट,कोला)
अत्यधिक मीठाचे सेवन (लोणची सॅल्टेड फ्राईड फुड )
मद्यपान
सीगारेट स्मोकींग
रिफाईंड साखरेचा जेवणातील अधिक वापर
अत्यधिक मांसाहार ईत्यादी
आपल्या आईवडिलांपासून मिळणारी जनुक आपले शरीर व अस्थि यांची संघटना ठरवतात परंतु आपला आहार व आपले राहाणीमान यात महत्वाची भूमिका बजावतात.भारतात साधारणतः प्रत्येक ३ स्त्रीयांमध्ये १ स्त्री आणि प्रत्येक ५ पुरूषांमध्ये १ पुरुष ऑस्टीओपोरोसीस ने ग्रस्त आहेत.ह आजार रूपलक्षणाविरहीत असल्याने त्याचे परिणाम प्रकट झाल्यावरच हा लक्षात येतो म्हणूनच याला Silent Disease म्हणतात.साधारणतः प्रदीर्घ वेदना(Chronic Pain),फ्रॅक्चर ,शारिरीक व्यंग अशा स्वरूपात पुढ्यात येतो.या आजारामुळे तुमच्या दैनंदिन जीवनातही बराच बदल होऊ शकतो.तुमच्या प्रातः विधीपासून ते तुमच्या चालण्याफिरण्यावर याचा परिणाम होतो.स्त्रीयांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक दिसते.भारतातील साधारणतः ३० कोटी लोकांना या आजाराने ग्रासलेले आहे.यातील साधारणतः २/३ स्त्रीया आहेत.ओस्टीओपोरोसिसमुळे स्त्रीयांच्या शरीररचनेत वयोमानानुसार आक्रुतीत दाखवल्याप्रमाणेबदल होऊ शकतो.

स्त्रीयांच्या शरीरातील मासिक पाळीस कारणीभूत असलेल्या इस्ट्रोजेन हे हारमोन(संप्रेरक)काही प्रमाणात Ca च्या शोषणाचे काम करते.मासिक पाळी बंद झाल्यावर (Menopause)अथवा अशा स्त्रीया ज्यांना अनियमित मासिक पाळीचा त्रास होतो याच्यांत या हारमोन(संप्रेरक)च्या अभावाचा परीणाम Caच्या शोषणावर (Absorption)होतो.यावेळी जर शरीरास योग्य प्रमाणात मिळाले नाही तर फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते.
यावर उपाय काय? तर अगदी सोपा आहे.आपल्या बॅंकेत ऐन उमेदीच्या काळात जास्तीत जास्त डिपॉसिट ठेवणे आणि पुढील काळातही हे डिपॉसिट नियमीत ठेवत जाणे.यासाठी वर सांगितल्याप्रमाणे योग्य आहार घेणे व Ca ला शरीरात येण्यास रोखणार् या सवयींचा त्याग करणे.तसेच सूर्याची कोवळी किरणं आणि नियमीत व्यायाम हे ही Ca च्या शरीरातील शोषणास व रक्तातील Ca च्या हाडांमधील शिरकावास आवश्यक आहेत.
वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यात शरीराला वेगवेगळ्या प्रमाणात Ca लागते.खालील तक्त्यात वयानुसार शरीरास लागणारे Ca चे प्रमाण दिले आहे.
(द फूड ऍन्ड न्यूट्रीशन बोर्ड नूसार)
| वय | Ca प्रमाण / दिवस |
| ० ते ६ महिने | २१० मिलीग्रॅम /दिवस |
| ७ ते १२ महिने | २७० मिलीग्रॅम /दिवस |
| १ ते ३ वर्ष | ५०० मिलीग्रॅम /दिवस |
| ४ ते ८ वर्ष | ८०० मिलीग्रॅम /दिवस |
| ९ ते १३ वर्ष | १३०० मिलीग्रॅम /दिवस |
| पुरूष १४ ते १८ वर्ष | १३०० मिलीग्रॅम /दिवस |
| पुरूष १९ ते ५० वर्ष | १००० मिलीग्रॅम /दिवस |
| पुरूष ५१ वर्ष आणि अधिक | १२०० मिलीग्रॅम /दिवस |
| स्त्रीया १४ ते १८ वर्ष | १३०० मिलीग्रॅम /दिवस |
| स्त्रीया १९ ते ५० वर्ष | १००० मिलीग्रॅम /दिवस |
| स्त्रीया ५१ वर्ष आणि अधिक | १२०० मिलीग्रॅम /दिवस |
(याला अपवाद असू शकतात काही विशीष्ट आजारात Ca चे प्रमाण कमीअधिक होऊ शकते.[*])
स्त्रीयांसाठी गरोदरपणात आणि बाळंतपणानंतरही डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे Ca च्या गोळ्या घेणे आवश्यक आहे कारण या काळात आईच्या रक्ताद्वारे आणि नंतर दुधातून बाळाला Ca मिळत असते.
शरीरास जर योग्य कॅलशियम मिळाले नाही तर काही कालावधीनंतर आपल्या हाडांची संघटना खाली आक्रुतीत दाखवल्याप्रमाणे होऊ शकते.आणि अशी ठिसूळ हाडे जराशा धक्क्याने अथवा मारामुळे मोडु शकतात.

बर्याच जणांना हा प्रश्न पडला असेल(जास्त करुन काका,काकु,मावशी,आजी,आजोबा अर्थात साधारणतः ४५ पेक्षा जास्त वयांच्या मंडळींना) की आम्ही ओस्टीओपोरोसिसने ग्रस्त आहोत की नाही हे आम्हाला आता कसे कळणार? यासाठी आपल्या डॉक्टरांशी जरूर संपर्क साधा कारण आज अशा अनेक चाचण्या आहेत ज्याद्वारे या आजाराचे निदान होऊ शकते.डेक्झा स्कॅन ही अशीच एक चाचणी आहे.

डेक्झा स्कॅन
या स्कॅनद्वारे तुम्ही ओस्टीओपोरोटीक आहात का? असाल तर किती प्रमाणात याची माहिती मिळते.[अस्थिक्षयाच्या देखील वेगवेगळ्या अवस्था (stages)असतात.डेक्झास्कॅन तसेच काही विशीष्ट प्रकारच्या रक्ततपासण्यांवरून आपली हाडं नक्की कोणत्या अवस्थेत आहेत हे कळू शकते.]आणि त्यानुसार तुम्ही आपल्या आहारात आणि राहाणीमानात बदल करु शकता.य़ाच प्रमाणे जर या आजाराचे निदान झाले तर आज अनेक औषध उपलब्ध आहेत ज्यामुळे हा आजार आटोक्यात येऊ शकतो.
आयुर्वेदात वर्णन केलेल्या योग्य दिनचर्या पालनामुळेही या व्याधीचा मज्जाव करता येतो.त्याचप्रमाणे काही वनौषधी तसेच रसौषधींचाही उपयोग या व्याधीत केला जातो.(*)
मावशीचे फ्रॅक्चर झाल्यावर तिला या सर्व गोष्टी समजावून सांगितल्या आणि बाळंतपणानंतर Ca च्या गोळ्या घेण्यासाठी टोलवाटोलवी करणार्या मुलीला नियमीत Ca च्या गोळ्या देणार्या मावशीला पाहून त्या तीला कळल्या याची खात्री मला पटली कारण शेवटी कधीही Prevention is better than Cure.
डॉ.विदुला लाड जाधव.
बी.ए.एम.एस.,मुंबई.
*क्रुपया आणखी माहितीसाठी आपल्या डॉक्टरशी संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment